जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 25 September 2026

वाढदिवस दिनी माणुसकी आणि कृतज्ञतेतून उपकाराची उतराई

वडीलधाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचा आदर करत वाढदिवस केला साजरा. मैत्री, माणुसकी आणि कृतज्ञतेचा आदर्श म्हणजे सुनील कडूसकर

देहू : आज माझे जिवलग मित्र आणि व्यावसायिक सहकारी सुनील शांताराम कडूसकर यांचा 24 सप्टेंबर वाढदिवस होता.
सुनीलजी आणि माझी मैत्री केवळ वैयक्तिक नात्यापुरती मर्यादित नाही. हनुमान मित्र मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेल्या सामाजिक कार्यापासून आजपर्यंत आम्ही अनेक उपक्रमांत एकत्र काम केले. समाजकारण, व्यवसाय आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आमचा सहवास सातत्याने वाढत गेला. सर्वांशी आपुलकीने वागणारे, कोणाशीही वैर न ठेवणारा त्यांचा स्वभाव म्हणूनच ते अनेकांचे जिवलग झाले आहेत.
सुनीलजींचे मूळ गाव कोरेगाव बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे आहे. मात्र लहानपणीच ते शिक्षणासाठी आपल्या आजोळी देहू येथे आले आणि देहू हीच त्यांची कर्मभूमी बनली.
त्यांचे आजोबा *कोंडीबा (अण्णा) कंद* हे देहूचे पोलीस पाटील होते. तसेच त्यांचे दोन्ही मामा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे समाजाशी नाते जोडण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना बालपणापासूनच मिळाली, असे म्हणावे लागेल.
आज सुनीलजींचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध आहे. विविध सामाजिक उपक्रमांत ते सक्रिय असतात आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी विविध पदांवर काम करत आहे. विशेष म्हणजे *जन्मभूमी कोरेगाव असो किंवा कर्मभूमी देहू* तेथील माणसांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे.
पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेले एक कार्य या सगळ्यापेक्षा वेगळे आणि मनाला स्पर्शून जाणारे आहे.
बालपणीचे ऋण... आयुष्यभराची कृतज्ञता!
कोरेगावमध्ये त्यांच्या शेतात काम करणारा एक सालगडी होते — रायबा रेवजी मधे उर्फ राया मामा.
ठाकरवाडीतील रायबाशी सुनीलजींचे लहानपणापासूनच एक विलक्षण नाते होते. बालपणी सुनीलजी आणि रायबा यांचा जवळचा सहवास होता. इतका की, सुनीलजी २४ तास त्याच्यासोबत राहायचे.
एकदा लहानपणी सुनीलजींना विंचू चावला. त्या संकटाच्या प्रसंगी रायबाने अथक प्रयत्न करून त्यांना वाचविण्यासाठी धडपड केली. त्या बालपणीच्या प्रसंगाची आणि रायबाने आपल्यावर केलेल्या प्रेमाची आठवण सुनीलजींच्या मनात आजही जिवंत आहे.
काळ पुढे गेला...
आज रायबा सुमारे ७० वर्षांचे आहेत. परिस्थितीने त्यांना एकाकी केले आहे. वृद्धापकाळ, आर्थिक अडचणी आणि हालअपेष्टा यांच्या छायेत त्यांचे जीवन जात आहे.
ही परिस्थिती सुनीलजींना समजली आणि ते अस्वस्थ झाले.
“ज्याने बालपणी माझ्यासाठी एवढे केले, त्याच्या उतारवयात मी त्याच्यासाठी काय करू शकतो?”
हा विचार त्यांच्या मनात आला.
आणि महत्त्वाचे म्हणजे हा विचार केवळ विचार म्हणून राहिला नाही.
सुनीलजींनी ठरविले की रायबा आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या आयुष्यभर दर महिन्याला किराणा व आवश्यक जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता आपण करायची.
कुठलाही गाजावाजा नाही... कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा नाही...
आणि आज, स्वतःच्या वाढदिवशी, सुनीलजींनी आपल्या कुटुंबासोबत रायबा आणि त्यांच्या पत्नीच्या घरी जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या आणि त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला.
आज रायबा आणि त्यांच्या पत्नीच्या मनात किती आनंद झाला असेल?
ज्याला कदाचित आपल्या आयुष्यात आपण कोणासाठी महत्त्वाचे आहोत ,असे वाटत नसेल, त्याला अचानक आपले बालपणीचे प्रेम आणि माणुसकी आठवणारा एक माणूस आपल्या दारात येतो आणि म्हणतो—
तुमची काळजी आता माझी जबाबदारी आहे.”
यापेक्षा मोठी वाढदिवसाची भेट कोणती असू शकते?
आजच्या स्वार्थी आणि भौतिक सुखाच्या स्पर्धेत अनेकदा माणूस पैसा, प्रतिष्ठा आणि सुखसोयींच्या मागे धावताना जीवनातील खरी शांतता हरवून बसतो.
पण सुनीलजींनी आज दाखवून दिले की खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आहे.
आणखी विशेष म्हणजे हे केवळ एका दिवसाचे किंवा एका महिन्याचे औदार्य नाही.
ही एका बालपणीच्या ऋणाची आयुष्यभर जपलेली कृतज्ञता आहे.
वाढदिवसाच्या दिवशी स्वतःसाठी काहीतरी घेण्याऐवजी, ज्याने आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्यासाठी काही केले, त्या व्यक्तीच्या उतारवयात त्याचा आधार बनणे — हीच खरी माणुसकी.
सुनीलजी, आपल्या या कृतीतून एक सुंदर संदेश समाजासमोर आला आहे—
“उपकाराची परतफेड नेहमी पैशाने होत नाही; ती कृतज्ञतेने आणि माणुसकीनेही करता येते.”
आपल्या वाढदिवसानिमित्त आपण घेतलेला हा संकल्प आणि त्याची केलेली प्रत्यक्ष अंमलबजावणी निश्चितच प्रेरणादायी आहे.
आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले आयुष्य असेच समाजासाठी, मित्रांसाठी आणि गरजू माणसांसाठी आधार देणारे राहो.
आपल्या या माणुसकीच्या कार्याला मनापासून सलाम!
रायबा आणि त्यांच्या पत्नीच्या दुःखात सहभागी होऊन, त्यांना आपले मानून त्यांच्या उतारवयाचा आधार बनण्याचा सुनीलजींचा संकल्प पाहिला की संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आठवतो:
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेंचि जाणावा .
रशीद धोंडफोडे
वरिष्ठ व्यवस्थापक मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक पुणे आणि माजी अध्यक्ष देहू शहर काँग्रेसने कमिटी आहेत.