जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या एम.डी.पी. 24 October 2026

पुणे जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य

स्थलांतरित लाभार्थ्यांना सोयीच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा

पुणे : राज्यातील दुष्काळग्रस्त घोषित ३०४ तालुक्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू आहे. रोजगार किंवा पाण्याच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या नागरिकांनाही सोयीच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेता येणार आहे. कोणतेही पात्र कुटुंब हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली.
जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील ३०४ तालुक्यांत खरीप हंगाम २०२६ साठी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अन्नधान्य वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने धान्य:
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा विनाविलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेत समाविष्ट नसलेल्या पात्र व्यक्तींनी मागणी केल्यास विहित निकष, उत्पन्न आणि उपलब्ध इष्टांकानुसार त्यांचा अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब प्रवर्गात समावेश करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी शिधापत्रिकेतील सदस्यांचे आधार संलग्नीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’चा लाभ:
स्थलांतरित लाभार्थ्यांना ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ सुविधेद्वारे अन्य सोयीच्या रास्तभाव दुकानातूनही धान्य घेता येईल. ई-पॉस उपकरणाद्वारे बायोमेट्रिक ओळख पडताळून वितरण केले जाणार आहे.
गैरव्यवहार रोखण्यासाठी दक्षता:
‘मिशन सुधार’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. अन्नधान्याची वेळेत उचल व वितरण, तसेच काळाबाजार, अवैध साठेबाजी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.