मावळ: पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पुष्पलता डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल आंबी येथे सोमवारी(ता.31) विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास पोलीस उप-आयुक्त परिमंडळ -४ पिपरी-चिंचवड हद्दीतील जवळपास ११० शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.
पोलीस उपयुक्त श्वेता खेडकर म्हणाल्या, अंमली पदार्थाच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी विद्यार्थामध्ये व्यापक जनजागृती निर्माण व्हावी. पोलीस, शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे सामुहिक सहभागातून प्रत्येक शाळा,महाविद्यालय हे अमली पदार्थ मुक्त करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दीष्ट आहे .हे अभियान केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न ठेवता सातत्यपूर्ण मोहिम राबवावी.
कार्यक्रमात देहुरोड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांनी प्रास्ताविक केले.ते म्हणाले, अंमली पदार्थ सेवन ही एका व्यक्तीची समस्या नसुन त्याचा संपुर्ण समाजावर परिणाम होत असतो. व्यसनमुक्ती समाजासाठी सर्वांनी विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.
डॉ. विल्यम साळवी यांनी व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत करण्यात येणा-या कामाबद्दल माहिती दिली.
डॉ. अनिष भट्ट यांनी व्यसनाची कारणे, उपाययोजना व परिणाम याबाबत सविस्तर मांडणी केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक संतोष पाटील यांनी अंमली पदार्थाबाबत माहिती देवून त्याचे दुष्परिणाम याबाबत सादरीकरण केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली. सहा. पोलीस आयुक्त म्हाळुंगे विभाग प्रिया डमाळे यांनी आभार मानले.
आंबे येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी कुलगुरू डॉ. शिरीष पाटील यांनी व्यसनमुक्ती अभियानासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रशासनाला प्रतिसाद देण्याचे अवाहन केले.
या कार्यक्रमास आयआयआयटी नाणोली चे कुलसचिव डॉ. नरेंद्र कुशवाह , डॉ. सुरेखा पाटील , डॉ. शितल नाईकवाडे , यांच्यासह परिमंडळ ०४ मधील सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते.
सदर उपक्रमाच्या माध्यमातुन अंमली पदार्थासंदर्भात काहीएक माहिती मिळाल्यास हेल्पलाईन क्रमांक ७७९८१००११२ तसेच मानस हेल्पलाईन क्रमांक १९३३ यावर माहिती देण्याबाबत अवाहन करण्यात येत असुन माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभागाचे सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ .बसवराज तेली यांचे मार्गदर्शनाखाली व श्वेता खेडकर पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ यांच्या पुढाकाराने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वतीने राबविण्यात आला.
शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी जनजागृती अभियान- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा उपक्रम
महाविद्यालयांतील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी यांचेसह सुमारे ४५० जणांचा उत्स्फूर्त सहभाग. आंबी येथील डॉ. डी .वाय .पाटील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपक्रम संपन्न.