जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या एम.डी.पी. 17 October 2026

देहूतील ग्रामस्थ सापडले कात्रीत? देहू नगरपंचायतच्या नोटीस मुळे संभ्रमावस्था निर्माण

जमीन विक्रेते, भूखंडधारक आणि घर बांधू इच्छिणाऱ्यांसमोर प्रश्न; विकास आराखडा कधी पूर्ण होणार?

देहू : देहू नगरपंचायतीच्या वतीने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर सूचनेमुळे देहू शहरातील जमीन मालक, भूखंडधारक आणि बांधकाम करू इच्छिणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नगरपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रस्तावित आरक्षणे आणि नवीन रस्त्यांमुळे काही भूखंड तसेच बांधकामे बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या सूचनेनुसार, शहरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना भूखंड पाडण्यात आले असून, यातील काही क्षेत्रे शेती ना-विकास विभागात तसेच देहू अॅम्युनिशन डेपोच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा भूखंडांबाबत आणि अनधिकृत बांधकामांबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नवीन विकास आराखड्यात प्रस्तावित आरक्षणे आणि रस्त्यांमुळे भविष्यात काही भूखंड व बांधकामे बाधित होण्याची शक्यता असल्याने संबंधित जमीन मालक आणि बांधकामधारकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. तसेच कार्यालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय नवीन बांधकाम करू नये आणि परवानगी नसलेल्या भूखंडांची खरेदी टाळावी, असेही सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसमोर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. विकास आराखडा तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना नागरिकांनी आपल्या जमिनीचे काय करायचे? जमीन विक्री करायची असल्यास कोणती प्रक्रिया अवलंबायची? बांधकामासाठी परवानगी नेमकी कधी आणि कोणत्या निकषांवर मिळणार? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
देहू शहराचा नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक असले, तरी विकास आराखडा तयार होण्यास लागणारा कालावधी, प्रस्तावित आरक्षणांची माहिती आणि बांधकाम परवानगीची प्रक्रिया याबाबत नागरिकांना स्पष्ट मार्गदर्शन मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार, घर बांधण्याचे नियोजन आणि नागरिकांची आर्थिक गुंतवणूक याबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
त्यामुळे देहू नगरपंचायतीने विकास आराखडा पूर्ण होण्याची अपेक्षित कालमर्यादा, प्रस्तावित आरक्षणे व रस्त्यांची माहिती, तसेच संबंधित भूखंडांवर बांधकाम परवानगी मिळण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
देहूचा विकास नेमका कधी आणि कसा साधला जाणार? विकास आराखड्याच्या प्रतीक्षेत नागरिकांनी किती काळ थांबायचे? या प्रश्नांची उत्तरे नगरपंचायत प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे. अन्यथा शहरांमध्ये बिल्डर लॉबी निर्माण होऊन सामान्य शेतकरी विकासापासून वंचित राहील अशी भीती नागरिकांमध्ये पसरलेली आहे.