जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 30 August 2026

यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा- पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांचे आव्हान

देहू, देहूरोड परिसरातील गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन; उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा.

देहू: यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस प्रशासनाने कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देहू आणि देहूरोड परिसरातील सर्व गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे 'डीजे मुक्त' ठेवावा, असे जाहीर आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले आहे. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य, लेझर लाईट्सवर बंदी असणार आहे.
पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले, उत्सवातील भपकेबाजी आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासाठी नियमांचे पालन सार्वजनिक मंडळांनी करावे.
सांस्कृतिक वाद्यांचा वापर करा. डीजे सिस्टीम ऐवजी ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक ढोलकी यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सवाचे पावित्र्य राखावे. डेसिबल मर्यादा पाळा. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत घालून दिलेल्या नियमांचे आणि आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे लागेल. लेझर आणि प्रेशर साऊंडवर बंदी असणार आहे. मानवी डोळ्यांना गंभीर इजा पोहचवणारे लेझर लाईट्स आणि हाय-व्हॉल्यूम प्रेशर किंवा प्लाझ्मा साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी असेल.सुरक्षेसाठी सीसीटीव्ही अनिवार्य आहे. विसर्जन मिरवणूक आणि मंडप परिसरात चोरीच्या घटना तसेच महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास साऊंड सिस्टीम जप्त करण्यात येईल.