देहू: मनुष्य मयत झाला की फार थोड्याच्या नशिबी यातना आणि अवहेलना येतात.मात्र आमच्या सारख्या प्रामाणिक राहिलेल्याच्या नशिबी मृत्यूनंतरही अवहेलनाच आहेत. याचा आज मी तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणी अनुभव घेत आहे. खरे तर संतांच्या भूमीत मरण आले, तर स्वर्ग ,मोक्ष प्राप्त होतो, असे म्हणतात. मात्र मला या ठिकाणी न मोक्ष आहे, ना स्वर्ग आहे . रस्त्याने जाणाऱा, येणारा प्रत्येक जण माझ्याकडे तिरस्काराने पाहतो.आपले नाक मुरडतो. मान वळवतो आणि पुढे निघून जातो. हेच मला दररोज अनुभवायला येत आहे. कारण माझे मरण आणि प्रामाणिकपणा याची किंमत आणि कदर ना देहू नगरपंचायत ला आहे,ना नागरिकांना आहे. मी हे सर्व निपचित पडून पहात आहे. आज खरे तर अनंत चतुर्थी आहे. गणपती बाप्पाला निरोप आहे आणि मी हा असा रस्त्यात पडून आहे. माझ्यामुळे अनेकांना नाहक त्रास होणार आहे. मी तरी काय करू ?माझ्याकडे पाहायला ना नगरपंचायत ला वेळ आहे, ना माझ्या शेजारी राहणाऱ्या नगरसेवकाला वेळ आहे, ना माझ्यासमोर असणाऱ्या व असंख्य माझे सारखे सांभाळणाऱ्या व्यक्तीला माझ्याकडे पाहण्यास वेळ आहे .त्यामुळे मृत्यू नंतरही मी याचा अनुभव घेत आहे.
दररोज माझ्या शेजारून नगरपंचायत चे स्वच्छता कर्मचारी रस्ता साफ करत जातात .मात्र माझ्याकडे त्यांचे लक्ष जात नाही. माझ्या शेजारून कचऱ्याच्या गाड्या जातात. पण मला बाजूला ठेवण्याचे कोणीही धाडस करत नाही. त्यामुळे माझ्या शरीराचा आता उन्हाने वास येत आहे. मी तरी काय करू? सर्वांना सांगून झाले .सर्वांनी मला पाहिलेले आहे. पण या रस्त्याने जाणाऱ्या नगरपंचायत च्या सीओना, अधिकाऱ्याला, ना कोणत्याच नगरसेवकाला मी दिसत नाही. दररोज राजकीय पक्षाचे नेते माझ्यासमोरून मिरवतात. स्वच्छतेच्या खोट्या शपथा घेतात. मात्र काम काहीच करत नाही, हे मी आता म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण अनुभव असा आलेला आहे .
जी नगरपंचायत वर्षाला स्वच्छता करण्यासाठी दीड ते दोन कोटी रुपये खर्च करते. त्या कर्मचाऱ्यांना मी दिसत नाही. खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी दिसत नाही. तसेच आता देहू नगरपंचायतने वेगळाच उपक्रम राबविलेला आहे. भटक्या कुत्र्यांना पकडणे. त्यांनाही पकडण्यासाठी गेल्या वर्षी दोन लाख रुपये खर्च केले. मात्र माझ्यासारखे जे मरणावस्थेत आहे, त्यांच्यासाठी काहीही नाही. तरी हे नगरपंचायतवासियांनो गावाच्या प्रवेशद्वाराजवळ मी वृत्त होऊन पडलेलो आहे . आज हजारो लोक येणार आहे. तरी तुमच्या या गावाची अकार्यक्षमता या गणेश भक्तांना दाखवू नका .हेच माझे आजचे तुम्हापुढे मनोगत आहे. बाकी मला जरी नेले नाही तरी कावळे, मुंग्या ,पक्षी यांच्यामुळे मी संपणार आहे, रात्रीच्या प्रहरी एखादे वाहन माझ्या अंगावरून जाईल आणि त्याच ठिकाणी मी समाधीस्थ होईल .पण मला अशी मुक्ती मिळणार नाही. तरी किमान मला मुक्ती देण्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घ्या .आणि भविष्यात माझ्यासारख्यांची दखल घ्या. हीच मरणानंतर तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो
तुमचा...
मृत कृत्र्याचे मनोगत, देहू नगरपंचायत प्रशासन जागा हो
गेले दोन दिवसापासून संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर देहू प्रवेशद्वाराजवळ मी मृत अवस्थेत पडून आहे मात्र माझ्याकडे कोणीही पाहत नाही