देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ६७
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती ।
जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार ।
अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥
देवपूजेवरी ठेवूनियां मन ।
पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥
तुका म्हणे फळ चिंतिती आदरें ।
लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥
______________________
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
______________________
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती ।
जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥
आजच्या काळात आपण पाहतो, काही लोक एखादा मोठा नवस बोलतात— "हे देवा, माझी लॉटरी लागली किंवा माझा व्यवसाय वाढला, तर मी तुला सोन्याचा मुकुट चढवेन." हा देवाशी केलेला व्यापार झाला. जसे आपण दुकानात जाऊन पैसे देऊन वस्तू घेतो, तसेच आपण देवाकडे काहीतरी देऊन देवाकडून सुख विकत घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
जिथे असा पैशाचा किंवा फायद्याचा हिशोब असतो, तिथे परमेश्वर कधीच प्रकट होत नाही.
जे लोक देवाची भक्ती केवळ आपली उपजीविका (नोकरी-व्यवसाय) चालवण्यासाठी, जमीन-जुमला मिळवण्यासाठी, समाजात पद-प्रतिष्ठा (राज्य) मिळवण्यासाठी किंवा पैसा (द्रव्य) कमवण्यासाठी करतात, त्यांच्याकडे 'देव' कधीच नसतो.
भाडेकरी वाहे पाठीवरी भार ।
अंतरींचें सार लाभ नाहीं ॥
मनात काहीतरी हेतू ठेवून भजन-पूजन करणाऱ्यांची अवस्था कशी होते, जसे रेल्वे स्टेशनवर किंवा मार्केटमध्ये ओझे वाहणारा हमाल (भाडेकरी) आपल्या पाठीवर साखरेचे किंवा ड्रायफ्रूट्सचे प्रचंड मोठे ओझे वाहून नेतो. तो ओझ्याखाली घामाघूम होतो, खूप कष्ट करतो. पण त्या गोणीत असणाऱ्या गोड साखरेची एक चवही त्याला चाखायला मिळत नाही.
माल पोहोचवल्यावर त्याला फक्त रोजची मजुरी मिळते, डोक्यावर असलेला माल मालकाचाच राहतो.
त्याचप्रमाणे, जे लोक मनात वासना ठेवून दिवस-रात्र अनुष्ठान करतात, पोथ्या वाचतात किंवा तीर्थयात्रा करतात, ते भक्तीचे शारीरिक कष्ट (ओझे) तर वाहतात; पण भक्तीचे जे खरे सार आहे— म्हणजे "आत्मिक शांतता आणि भगवंताचा आनंद"—
तो त्यांना कधीच मिळत नाही. ते फक्त संसारातील छोट्या-मोठ्या सुखांची मजुरी मिळवून समाधानी राहतात.
देवपूजेवरी ठेवूनियां मन ।
पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥
माणूस देवघरात बसून पूजा करत असताना, पण त्याच्या डोक्यात सांसारिक विचार सुरू असतील की, "माझ्या कोर्टाची केस कधी सुटेल? माझ्या शेजारी असलेल्या दुसऱ्या व्यापाऱ्यापेंक्षा मला जास्त नफा कसा होईल?"
अशा माणसाच्या समोरची मूर्ती जरी दगडाची (पाषाण) असली, तरी ती पूजणाऱ्या माणसाचे मनही लोभाने आणि स्वार्थाने दगडासारखेच निर्जीव झाले आहे. दगड कधी दुसऱ्या दगडाला चैतन्य देऊ शकत नाही. जेव्हा मनात केवळ भौतिक वस्तूंचा लोभ असतो, तेव्हा ती पूजा नसून केवळ एक जड क्रिया ठरते.
तुका म्हणे फळ चिंतिती आदरें ।
लाघव हे चार शिंदळीचे ॥
तुकाराम महाराज म्हणतात ,
जे लोक मनामध्ये फळाची आशा धरून देवाशी अतिशय गोड बोलतात, त्याची आळवणी करतात, त्यांचे ते वागणे एका व्याभिचारी स्त्रीसारखे (वेष्यावृत्तीसारखे) आहे.
निष्ठावंत पत्नी आपल्या पतीवर केवळ प्रेमापोटी प्रेम करते, कोणत्याही धनाच्या अपेक्षेने नाही. याउलट, एखादी कुलटा किंवा व्याभिचारी स्त्री एखाद्या पुरुषाशी केवळ त्याच्या पैशासाठी किंवा संपत्तीसाठी गोड बोलते, खोटं प्रेम दाखवते. पैसा संपला की तिचे प्रेमही संपते.
तसेच सकाम भक्तही देवाशी वागतात. जोपर्यंत देव त्यांच्या इच्छा पूर्ण करतो, तोपर्यंत ते देवाची स्तुती करतात. इच्छा पूर्ण झाली नाही की ते देव बदलतात किंवा नास्तिक बनतात. हे 'लाघव' (दिखाऊ प्रेम) देवाला कधीही आवडत नाही.
या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला "निष्काम भक्ती" शिकवतात.
देवाला सांगावे— "देवा, मला तुझ्याकडून काही नको, मला फक्त तू हवा आहेस." जेव्हा आपण संसारातील गोष्टी 'भूमि, राज्य, द्रव्य' इ देवाकडे न मागता केवळ देवाला त्यांची भक्ति मागतो, तेव्हा देव स्वतःहून आपल्या संसाराची काळजी घेतो. हीच खरी भक्ती आहे.
!! रामकृष्णहरी !!
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू .
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
देवा, मला तुझ्याकडून काही नको, मला फक्त तू हवा आहेस." जेव्हा आपण संसारातील गोष्टी 'भूमि, राज्य, द्रव्य' इ देवाकडे न मागता केवळ देवाला त्यांची भक्ति मागतो, तेव्हा देव स्वतःहून आपल्या संसाराची काळजी घेतो.