जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 09 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

अहंकार सोडल्याशिवाय खरी भक्ती जन्माला येत नाही. संतांची सेवा आणि मुखात अखंड नामस्मरण असेल, तर जीवनातील कोणतीही कठीण परिस्थिती किंवा कष्ट माणसाला दुःखी करू शकत नाहीत

देहू:
मज दास करी त्यांचा ।
संतदासांच्या दासांचा ॥१॥
मग होत कल्पवरी ।
सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥
नीचवृत्तिकाम ।
परी मुखीं तुझें नाम ॥२॥
तुका म्हणे सेवे ।
माझे संकल्प वेचावे ॥३॥
______________________
।।श्री तुकोबराय चैतन्य।।
______________________
परमार्थात भगवंताच्या भेटीपेक्षाही भगवंताच्या भक्तांची सेवा करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते. स्वतःचा अहंकार संपूर्ण बाजूला ठेवून, देवाकडे संतांच्या दासाचे दासत्व मागून भक्तीचा एक सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवत संतांच्या चरणांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांचे दास होणे हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे,
"मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥"
हे पांडुरंगा, मला थेट संतांचा दास बनवू नकोस, तर जे संतांची सेवा करणारे 'दास' आहेत, त्या दासांच्या दासांचाही नम्र 'दास' (सेवक) बनव! याला परमार्थात 'दासानुदास' अवस्था म्हणतात. जेवढी लीनता जास्त, तेवढी भगवंताची कृपा लवकर होते, हा यामागचा शुद्ध हेतू आहे.
"मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥"
"नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥"
सामान्य जीव जन्म-मरणाच्या फेऱ्याला आणि गर्भवासाच्या दुःखाला घाबरतो. पण तुकोबाराय म्हणतात की, जर मला संतांच्या दासाचे दासत्व मिळणार असेल, तर मला एका कल्पापर्यंत (करोडो वर्षांपर्यंत) जरी पुन्हा पुन्हा 'गर्भवास' (जन्म) घ्यावा लागला, तरी मी ते आनंदाने पत्करीन. नव्हे, त्यासाठी मला या जगात अगदी 'नीचवृत्तीचे' (अतिशय हलके किंवा कष्टाचे) काम करावे लागले तरी चालेल, फक्त माझी एकच अट आहे—माझ्या मुखात सतत 'तुझे विठ्ठल नाम' अखंड चालू राहिले पाहिजे. नामस्मरण असेल तर नरकही वैकुंठ वाटू लागतो, हेच महाराजांना सांगायचे आहे.
तुकोबारायांच्या या पराकोटीच्या लीनतेच्या भावाला पुष्टी देणारे त्यांचे पूर्वअवतारी संत नामदेव महाराज म्हणतात ,
"नामा म्हणे अखंड त्याचे चरणी विसावा । ऐसा जन्म मला द्यावा हरी ॥"
संत नामदेव महाराजही पांडुरंगाकडे केवळ वैष्णवांच्या चरणाचा विसावा आणि त्यांच्या दारातील पायरी (दगड) होण्याचे भाग्य मागतात.तर तुकोबराय दुसऱ्या एका प्रसिद्ध अभंगात
"संतांचे पायी हा माझा विश्वास । सर्व भावे दास झालो त्यांचा ॥"
हे नम्र भावाने सांगतात.
शेव‌टच्या चरणात तुकोबाराय आपल्या जीवनाचा अंतिम ध्यास स्पष्ट करतात:
"तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥"
तुकाराम महाराज म्हणतात की, हे परमेश्वरा, माझ्या मनात आता स्वतःच्या सुखाचे किंवा प्रपंचाचे कोणतेही संकल्प उरलेले नाहीत. माझ्या मनातील सर्व विचार, सर्व इच्छा आणि संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ संतांच्या आणि तुझ्या 'सेवेसाठीच' वेचले (खर्च केले) जावे, हीच माझी एकमेव अंतिम इच्छा आहे.
अहंकार सोडल्याशिवाय खरी भक्ती जन्माला येत नाही. संतांची सेवा आणि मुखात अखंड नामस्मरण असेल, तर जीवनातील कोणतीही कठीण परिस्थिती किंवा कष्ट माणसाला दुःखी करू शकत नाहीत. दासाचा दास होण्यातच परमार्थाचा खरा विजय दडलेला आहे.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमशः

नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान,
श्री क्षेत्र देहू.