देहू:
आहे तें सकळ कृष्णासी अर्पण ।
न कळतां मन दुजें भावी ॥१॥
म्हणउनी पाठी लागतील भूतें ।
येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥
ज्याचे त्या वंचलें आठव न होतां ।
दंड हा निमित्ताकारणें हा ॥२॥
तुका म्हणे काळें चेंपियेला गळा ।
मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥
______________________
।।श्री तुकोबराय चैतन्य।।
______________________
जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगात मानवी अज्ञानाचा आणि खोट्या अहंकाराचा पडदा फाडत आहेत. या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, अगदी आपला देह आणि श्वासही भगवंताच्या सत्तेने चालतो. परंतु, अज्ञानी जीव देहबुद्धीच्या अहंकारामुळे 'हे सर्व माझे आहे आणि मीच करतो' अशी विपरीत भावना मनात धरतो. या चुकीच्या भावनेमुळेच माणूस संसाराच्या फेऱ्यात आणि दुःखात कसा अडकतो, याचे सुंदर विवेचन महाराजांनी येथे केले आहे.
आहे तें सकळ कृष्णासी अर्पण ।
न कळतां मन दुजें भावी ।।
अभंगाच्या सुरुवातीलाच श्री तुकाराम महाराज सृष्टीचा अंतिम नियम सांगतात की, या जगात जे काही आहे, ते सर्व मुळातच साक्षात 'कृष्णाला (परमेश्वराला) अर्पण' झालेले आहे. त्याच्याच इच्छेने सर्व क्रिया घडत आहेत. परंतु, माणसाचे अज्ञानी मन हे सत्य न कळल्यामुळे 'दुजें भावी' म्हणजे द्वैत भावना निर्माण करते. 'हे माझे, ते तुझे, हा कर्माचा कर्ता मीच आहे' असा भ्रम मन धरू लागते.
म्हणउनी पाठी लागतील भूतें ।
येती गवसीत पांचजणें ॥
जेव्हा माणूस 'मी आणि माझे' म्हणू लागतो, तेव्हाच त्याच्या पाठीवर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ही 'भूतें' लागतात. तसेच 'पाचजणें' म्हणजेच पाच ज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, त्वचा, जिव्हा) त्याला विषयांच्या जाळ्यात गवसून (पकडून) टाकतात. मूळ मालक जो देव आहे, त्याला विसरल्यामुळे (आठव न होतां) माणूस खऱ्या आनंदाला मुकतो (वंचलें) आणि मग प्रपंचातील दुःख, चिंता, आधिव्याधी या रूपाने त्याला केवळ 'दंड' म्हणजेच शिक्षा भोगावी लागते.
ज्याचे त्या वंचलें आठव न होतां ।
दंड हा निमित्ताकारणें हा ॥
जसे राजाच्या खजिन्यातील कोट्यवधी रुपये नोकराच्या हातात असतात. तो नोकर जोपर्यंत 'हा खजिना राजाचा आहे' या भावनेत असतो, तोपर्यंत तो सुरक्षित असतो. पण ज्या दिवशी त्याच्या मनात 'हा खजिना माझाच आहे' असा खोटा भाव येतो, त्याच दिवशी राजाचे सैनिक त्याला पकडतात आणि तुरुंगाची हवा खावी लागते. आपल्या देहाचे आणि कर्माचेही अगदी तसेच आहे.
"तुका म्हणे म्यां तूं पण सारिलें दुरी । आलों या पंढरी घरा दिसी ॥"
जोपर्यंत 'मी आणि तू' हा भेद संपत नाही,
"तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥"
तुकाराम महाराज म्हणतात की, माणसाचे आयुष्य क्षणभंगूर आहे. 'काळ' (मृत्यू) कधीही झडप घालू शकतो. किंबहुना, काळाने माणसाचा गळा आधीच दाबून धरला आहे, प्रत्येक सेकंदाला त्याचे आयुष्य कमी होत आहे. मृत्यू इतका जवळ आलेला असतानाही हा अज्ञानी जीव शुद्धीवर येत नाही; तो सतत "मी मी", "माझे माझे" असाच घोर अंधारात ओरडत राहतो.
कर्म करताना 'मी कर्ता' हा अहंकार सोडणे आणि जे काही घडत आहे ते 'कृष्णार्पणमस्तू' या भावाने भगवंताला समर्पित करणे, हाच दुःखातून आणि काळाच्या पाशातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे.
!!रामकृष्णहरी !!
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू.
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
कर्म करताना 'मी कर्ता' हा अहंकार सोडणे आणि जे काही घडत आहे ते 'कृष्णार्पणमस्तू' या भावाने भगवंताला समर्पित करणे, हाच दुःखातून आणि काळाच्या पाशातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे.