सांगवी, पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगवी, पुणे येथे शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पारंपरिक भोंडला खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या उपप्राचार्या मेघा पोटे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिया बोरकर तसेच विद्यालयातील प्राध्यापिका यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख रुपाली थोरात यांनी भोंडला या पारंपरिक लोकउत्सवाची माहिती विद्यार्थिनींना दिली.
भोंडला, हादगा आणि भुलाबाई हे महाराष्ट्रातील स्त्रिया व मुलींचे पारंपरिक लोकउत्सव आहेत. शारदीय नवरात्रीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. या काळात सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. चांगला पाऊस पडावा, शेतीत भरघोस पीक यावे आणि समाजात सुख-समृद्धी नांदावी, अशी या उत्सवामागील लोकपरंपरा आहे. हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून पारंपरिक गाणी म्हणणे आणि खिरापतीचा पदार्थ ओळखणे, ही भोंडल्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
भोंडल्याच्या निमित्ताने सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याबरोबरच विद्यार्थिनींमध्ये सहकार्य, आनंद, एकोपा आणि आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण होण्यास मदत होते.
या कार्यक्रमात मनीषा गुंड, दीपाली खळदकर आणि विद्यार्थिनींनी भोंडल्याची पारंपरिक गाणी मोठ्या उत्साहाने गायली. त्यांच्या गाण्यांच्या तालावर इयत्ता अकरावी व बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक विभागातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे फेर धरला.
मनिषा पोखरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बाबुरावजी घोलप विद्यालयात पारंपरिक भोंडला उत्साहात संपन्न
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन. विद्यालयातील सांस्कृतिक विभागाकडून आयोजन