जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 10 October 2026

देहूत बैलपोळा सण पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत उत्साहात साजरा

परंपरेनुसार शेतकरी आपली बैलजोडी वाजत गाजत संत तुकाराम महाराज देऊळवाडा समोर घेऊन जातात. प्रवेशद्वारातून दर्शन करून बैलजोडी पुन्हा वाजत गाजत आपल्या घरी नेतात. घरातील महिला बैलजोडींना पुरणपोळी चा नैवेद्य खाऊ घालतात .

देहू : शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेला बैलपोळा सण देहू येथे मोठ्या उत्साहात शनिवारी
(ता.10 )साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डीजे आणि पारंपरिक संगीताच्या गजरात आपल्या लाडक्या मित्राची बैलांची मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या बैलांनी आणि मिरवणुकीतील उत्साहाने परिसरात सणाचे आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
गावातील मिरवणुकीनंतर घरी आलेल्या बैलजोडीला घरातील महिलांनी औक्षण केले . तसेच पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला.
वर्षभर शेतकऱ्यांसाठी कष्टणाऱ्या बैलजोडीची परिसरातील शेतकऱ्यांनी बैलपोळ्याच्या दिवशी सकाळपासूनच तयारी सुरू केली .घरातील आबाल वृद्धांनी इंद्रायणी नदीकाठी आणि शेतातील विहिरीवर आपल्या बैल जोडीला स्वच्छ पाण्याने अंघोळ घातली. त्यानंतर दुपारी वेगवेगळ्या रंगांनी बैलांना सजवले .फुलांच्या माळा, शिंगाला गोंडे
बांधले . तसेच घुंगरांच्या माळांनी बैलजोडी सजवली. सायंकाळी पाच वाजता देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी परिसरात मिरवणुकीला सुरुवात झाली.
देहू गावच्या मुख्य प्रवेशद्वारातून डीजे आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात शेतकरी आपली बैल जोडी घेऊन येत होते. बैलजोडी च्या पुढे तरुणाईने डीजे वाजवून बैलजोडीची मिरवणूक काढली. तर काहीजणांनी पारंपारिक वाद्य वाजवत मिरवणूक काढली .येथील श्री शिवाजी महाराज चौकामध्ये गावातील देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी विकास सोसायटीच्या वतीने बैलजोङी असलेल्या शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
सोसायटीचे चेअरमन नंदू काळोखे, शांताराम शेवकर, गुलाब शेठ काळोखे, प्रीतम वारघडे, रवी काळोखे, अँड.भोलानाथ काळोखे, महादेव बिरदवडे, धनंजय मुसुडगे, राजेंद्र काटे ,सतीश काळोखे व इतर संचालक उपस्थित होते.या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
बैलपोळा हा शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते जपणारा पारंपरिक सण आहे. शेतीच्या कामात वर्षभर साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. देहू परिसरात पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा करण्यात आला.