जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 19 August 2026

ज्ञान हीच संपत्ती -अँड. संदीप कदम अजित दादा इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन

आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने अजित दादा ए.आय. इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन.

आकुर्डी: पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल होत संगणकाचा उदय झाला. ठराविक संस्था ठराविक लोकांनाच संगणक शिकवत होत्या .त्यामुळे ठराविक लोकांना संगणकाचे ज्ञान मिळायचे . ग्रामीण भागातून आलेल्या व आपल्या ज्ञानाच्या जोरावर पहिला संगणक आपल्याकडे डॉ. विजय भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बनवला . आज नविन तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. समाजात ज्ञानामुळे प्रगती होत आहे. त्यामुळे स्थावर आणि जंगम मिळकत मालमत्तेपेक्षा ज्ञान हीच खरी संपत्ती आहे ,असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अँड. संदीप कदम यांनी बुधवारी( ता. 19) श्री म्हाळसाकांत विद्यालय येथे केले.
आकुर्डी येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालय व ए. आय. आर. जी. संस्थेच्या वतीने ए .आय. लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन अँड. संदीप कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
अँड. संदीप कदम पुढे म्हणाले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांनी विद्यार्थ्यांना ए.आय .चे ज्ञान संस्थेतर्फे देण्याचे सांगितले होते. अजितदादा यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विविध शाखांमध्ये एआय लॅब सुरू करण्यात येणार आहेत.त्यापैकी लोहगाव, खराडी, आकुर्डी या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत. या एआय लॅबमधून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणार आहे .आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयात अजित दादा एआय इनोवेशन लॅबचे नामकरण आज करण्यात आले आहे.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव( प्रशासन) ए. एम. जाधव, ए. आय. आर. जी चे मुख्य व्यवस्थापक प्रताप पवार, विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे, उपप्राचार्य शशिकांत सात्रस, उपमुख्याध्यापिका एस .वि. पठारे ,पर्यवेक्षिका डी. एस. पारवे ,एस. डी. काळे, व्ही एस अभंग ,श्रावणी खानविलकर, अथर्व दुर्गावले, दीपक रेड्डी, रोहन पाटील ,श्री केतकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका धनश्री जाधव, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा खांडरे, अशोक आवारी व इतर व्यासपीठावर उपस्थित होते.
सहसचिव श्री.जाधव आणि प्रताप पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य भानुदास मालुसरे यांनी प्रास्ताविक केले . शिक्षिका विद्या कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य शशिकांत सात्रस यांनी आभार मानले.